Posts

तू...

दिवसभराचा थकून मी दार ठोठावणार इतक्यात, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?" तू गात होतीस, तसा गायकी गळा नाही तुझा पण सुंदर गातेस.. मागेही जाणवलं होतं ते, जेव्हा स्वयंपाकघरात फोडणी देताना "सलोना सा सजन है और मै हू" गात होतीस. गोड वाटला आवाज तुझा जेव्हा मिठीत शिरून, "रिमझिम गिरे सावन" आळवत होतीस. तेव्हा तर अगदी पाऊसच पडावा इतकं सुंदर बरसत होतीस.. "जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई" तुझ्या कातरलेल्या स्वरांनी मी भानावर आलो, हळूच दार उघडलं, तर पाठमोरी बसलेलीस, मांडीवर छोटी तू, मी अगदी हळुवार पावलांनी जवळ आलो. साधी कॉटनची लाल साडी, पण किती आकर्षक दिसलीस, छोटीशी काळी टिकली, कानात नाजूकसे मोती, आणि कसलंही बंधन नसलेला मुक्त गळा, मंगळसूत्राशिवाय! पिल्लू तुझ्या कुशीत झोपलेली, तिच्या गालावर तुझ्या डोळ्यातला अश्रू सांडणार, इतक्यात मी अलगद तो झेलला, तू जणू मी आहे हे माहीत असल्यासारखी प्रसन्न हसलीस.. "आज उशीर केलास यायला, पिल्लू झोपलं बघ बाबाला न भेटता" मी तरीही तुझ्याकडे एक...

मीरा कृष्ण राधेचा...

व्याकूळ मन माझे  शोधी निखळ प्रेमझरा , त्या वेड्या नभी बरसे  रिमझिमत्या पाऊसधारा ..  चिंब ढगांतून कुंद हवेतून  येई गंध प्रीतीचा , ओलेता होऊन जाई  पदर त्या रातीचा ..  धुंद होऊनी मदमस्त वारा  डोले आनंदात , हासत लाजत वाजवी वीणा  मंद दिव्याची वात ..  ऐल तटावर पैल तटावर  चाले खेळ लाटेचा , त्यासवे मस्तीत नाचे निळा कृष्ण राधेचा .. तया पाहूनी हरखूनी जाई  कृष्णदेखणी राधा ,  कृष्णलीला ही चोरुनी पाहे  वृंदावनीची राधिका .. कृष्णपटलावर मुरडत नाचे मोर - लांडोरीची जोडी ,  त्या नृत्यासह हळूच वाढे  गोप -गोपिकांची लाडी .. त्यांना पाहुनी चिडूनी जाई कृष्णवेडी राधा,  त्याच कृष्णाला गाभारी नेई  कृष्णभक्त मीरा .. प्रेमापलीकडल्या तिच्या प्रेमाला  नसे कसला धिक्कार , दुःखाच्या सागरीही हासेल  असा हा प्रेमालंकार .. मनमंदिरात राधेच्या  केवळ तिचा कान्हा , या प्रीतीच्या आभूषणी शोभे रत्नरूपी मीरा .. अंत असे ना या प्रेमाला  युगायुगांची गोष्ट , कलियुगातही आहे  राधा...

कागदावरली अक्षरे !

कित्येक दिवस निःशब्द होता माझा कंठ, लेखणीची शाई सुकून गेलेली, कोऱ्या कागदांचा ढीग तसाच पडून, एका कोपऱ्यात, न वापरणाऱ्या वस्तूंसमवेत..  रोज बघायचा माझ्याकडे, हसायचा छद्मीपणे, मनातली सल मुद्दाम उलगडायचा, भळाभळा वहायचे मग मी, रक्तच रक्त सांडायचं कागदावर. पण तरी तो हसतच रहायचा, रक्ताळलेला चेहरा, भयानक, आणि क्रूर हसू! अजून काहीतरी मागायचा, सतत, दिवसरात्र टोचत रहायचा मला, छळत रहायचा माझ्या अंतर्मनाला.  मी रोज कुढत होते, पाहत होते माझ्या टेबलावरचा पसारा, चुरगळलेले असंख्य कागद, अधीर होऊन रेघोट्या मारलेले कागद, आणि काहीच न लिहिलेले मूक कागद, आज शेवटी घेऊन बसले सगळा पसारा,  खरंतर सगळ्यांपेक्षा जास्त बोलले मूक कागद, परखडपणे, पण स्पष्ट!  मी हसले कागदाच्या ढिगाकडे पाहून,  म्हटलं त्यांना , " संन्यास नव्हता घेतला मी,  ही केवळ विश्रांती होती,  गरुडझेपेआधीची.  लेखक संन्यास घेतच नाही,  संन्यास घेतात त्याचे शब्द,  तो तरीही जिवंत असतो, वेन्टीलेटरवरच्या शरीरासारखा...  तुम्ही डिवचत होतात,  चिथवत होतात मला,...

निशा..

आज निशेने माळल्या केसांत ताऱ्यांच्या माला, चंद्र हासे नभाआडूनी पाहुनी त्या रजनीला. काळ्याभोर साडीवर चांदण्याची नक्षी, झाडाच्या फांदीवर डोले रात्रीचा दिवसपक्षी. विखुरले केस तिने मग, तारे सांडले आभाळी गर्द काळ्या नभी पसरली जर्द चांदण्याची काजळी. इतक्यात कुठूनसा कानी आला पावा, रजनी केवळ मनात जपे तिच्या मिलिंदमाधवा. त्या पाव्याच्या मंद सुरांनी मोहिले मन, इकडे व्याकुळ एक तरुणी तिच्या सख्याविण. सूर होई आर्त, पण सखा तिचा धूर्त, उगाच लटके छेडी तिला, ठेऊन गालांवर हसू, ती बिचारी बावरी होई, डोळा येती अश्रू. त्या अश्रूंची फुले माळूनी जाई तिचा साजण, हसरी ती निशा खुलवी मग नभांचे अंगण...

घडी..

तिने कूस बदलत चादरीची प्रत्येक घडी चाचपडून पाहिली, एकच आशा मनात, त्याच्या धुंद सुवासाची. काही घड्यांत सापडले तिला उन्मादाच्या कड्यावरले उसासे, काहींमध्ये निव्वळ स्पर्शाची अस्पष्ट रेषा. एका घडीत सापडला लटक्या रागाचा कंगोरा, दुसरीत त्याच्या चुंबनांची प्रेमभेट. एकघडी फारच चुरगळलेली होती, तिच्यात होती वासना, उत्कट स्पर्शाच्या धाग्यांची वीण, विस्कटलेले काही हुंकार, आणि कुस्करल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्या. चादरीच्या कोपऱ्याशी तिला सापडली एक गाठ, रागात एकदा त्यानेच, " मला अजिबात हात लावू नकोस" म्हणत बांधलेली, हलकेच सोडवली तिने, त्यात मग सापडला तिला त्याच्या हसण्याचा आवाज. असंच शोधत शोधत सगळ्या रात्री एकत्र केल्या तिने, प्रेम, उत्कटता, आणि धडपड त्यांच्या स्पर्शांची. तिचं लाजणं, हुंदक्यात लपेटून हसणं, सुखाचे परमोच्च क्षण उपभोगणं तिला नव्याने सापडत गेलं, आणि उमगत गेलं त्याचं वाढलेलं प्रेम !

निनावी..

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला, कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर? पांढरा कागद निळा होईल, कृष्णासारखा ! आणि झिरपेल त्यावर माझी प्रत्येक भावना, उघड होईल माझं मन, आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू. लोकं वाचतील, चर्चा होतील, टीका करतील, थोरवी गातील माझ्या लेखनाची... पण नकोय मला हे, मला बोलायचंय कुठल्याही मापात न झुकता, कोणत्याही चष्म्यातून न पाहता. कागद निळा झाला, उतरली प्रत्येक भावना, जखमेला घातलेला टाका उसवला, आणि उरलं माझं रितेपण ! तितक्यात पाऊस आला, माझ्या आसवांचा, कागद भिजू लागला, शब्द धूसर झाले, स्वल्पविराम लोपले, आणि लुप्त झाले पूर्णविराम ! कागद पुन्हा पांढरा झाला, जुन्या ओळींच्या नकाशासह. माझं मन पुन्हा सुखावलं, शाश्वत, चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं, सत्य असतो केवळ तो क्षण, रसरसलेला, टप्पोरा भरलेला, माझ्या कोऱ्या कागदासारखा. लिहित असते मी त्यावर आवडेल त्या शाईने, कधी जपून ठेवली जातात काही पानं, तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा !

पाऊससखा....

आज तुला भेटायला यावंसं वाटतंय, न्हाऊन निघावंसं वाटतंय तुझ्या स्पर्शात, श्वासांच्या उसळलेल्या समुद्रात, गंधाच्या उधाणलेल्या वादळात, आणि अडकावंसं वाटतंय बळकट बाहूंच्या भोवऱ्यात. पण बांधलंय मला कर्तव्यांनी, पाऊल अडतंय मनात नसूनही, म्हणून मी पाठवलाय पाऊस, भेटायला तुला, निरोप दिलाय, "फक्त भेट, भिजवू नकोस." तो लबाड ऐकेल याची खात्री मात्र नाही. त्याच्यासोबत सौदामिनीही येईल, जशी मी येते, लखलखत, चंदेरी होऊन. एक सप्तरंगी इंद्रधनुष्य येईल, बघ, कदाचित माझं हसू तुला आठवेल. वाऱ्याचा झोतही येईल, तुला पिसासारखं हलकं करायला. झेल त्या प्रेमधारा मनभरून, तशाच जसं कोसळणाऱ्या मला झेलतोस, अगदी अलगद, कोवळ्या पानावरल्या इवल्या रेशीम किड्यागत. तो पाऊस नं, आहेच मुळी खट्याळ, भिजवलंच ना तुला चिंब? माझ्याकडे आला तो नंतर, रागात मी विचारला जाब त्याला, तर गालातल्या गालात हसून म्हणाला, " मला भेटता येत नसतं, बरसतो मी फक्त. अगदी तुझ्यासारखा. अविरत, बेभान, अविश्रांत, बरसतो केवळ तिच्यासाठी, आणि कोसळत असतेस तू वेड्यासारखी, तुझ्या प्राणसख्यासाठी!"