Posts

आभाळ

आवडायचा त्याला माझा हात घट्ट धरायला, माझ्या नखांशी खेळण्यात कोण जाणे काय आनंद मिळायचा.  माझे केस मोकळे असले की उगाचच ते कुरवाळत बसायचा,  मधेच माझे गाल ओढायचा. "आई गंऽऽ" ओरडल्यावर हसत माझ्याकडे बघत राहायचा, त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसायची. श्वास कोंडून जाईल इतकी घट्ट मिठी मारायचा, जणू काही मला स्वतःत सामावून घेण्याचा फोल प्रयत्न असायचा. रस्त्याने चालताना हात खांद्यावर ठेवायचा,  एक आश्वासक दिलासा देऊन जायचा. तसा तो अबोल पण स्पर्शातून आभाळ मांडून जायचा.  आधी आधी त्या आभाळातले तारे वेचताना व्हायची कसरत माझी, कधीतरी पटकन मिळायचे, मात्र कधीतरी रात्रंदिवस शोध सुरू असायचा. मग हळू हळू कळलं त्याचं प्रेम, झिरपलं ते शरीरात, खोलवर भिनलं रक्तात,  तेव्हा जाणवलं, उगाचच वेचत होते मी तारे, त्याच्या आभाळाचा सडा तर माझ्याच दारी होता.. 

रेषा

  तुझी चित्रं माझ्या कविता तुझं चित्रांचं जग माझा अक्षरांचा निवारा तुझे विस्कटलेले रंग माझ्याकडे शब्दांचा पसारा अन् रेषांचा खेळ सारा...   तुझा कॅनव्हास माझं पान तुझा रंगछटांचा सहवास माझं शब्दखुणांचं रान तुझी कुंचल्याची हौस माझ्या लेखणीचा पिसारा अन् रेषांचा खेळ सारा...   तुझं चित्र तुझ्या रेषा माझे शब्द माझ्या शिरोरेषा तुझ्याकडे बहरलेली वेल माझ्याकडे कवितांचा किनारा अन् रेषांचा खेळ सारा... तू, तुझ्या रंगांचं सार मी, माझ्या शब्दांचा संसार कुंचला झाला लेखणी लेखणी झाला कुंचला तू, मी, आपण, तुझ्या माझ्या कलेचा डोलारा अन् रेषांचा खेळ सारा...

सोबत

काल आपल्या घरावरून जात होते सहजच मोगऱ्याकडे नजर गेली काळजी घेत नाहीस ना त्याची ? शुष्क, कोमेजलेला होता, त्याला सांभाळ  थोडं , झाडांनाही प्रेम लागतंच ना ..   घराकडे पाहिलं, पार रया गेलेली भितींवर रंगांच्या आकृत्या आणि कौलांतून दिसणारं आभाळ जरा घराकडे लक्ष दे, प्रेमाने भिंतीवर हात फिरव, घरालाही माया लागतेच ना ..   दरवाजा बंद होता तरी आत शिरले आपल्या खोलीत आले, अजूनही मी लाव लेलेच पडदे आहेत बदल ते, शुभ्र अभ्रासारखे पडदे लाव पडद्यांनाही गोंजारावं लागतंच ना ..   माझी पुस्तकांची कपाटं, ती मात्र अगदी स्वच्छ, तुझ्या लक्षात आहे वाटतं ? छान हात फिरवतोस ना त्यांवरून ? “मी नसले तरी माझी पुस्तकं जप” सांगून गेलेले तुला, पुस्तकांनाही कुरवाळावं लागतंच ना ..   आपले कॉफीचे मग्ज, माझ्या डायऱ्या, मला आवडणारं तुझं निळं शर्ट, माझ्या काचेच्या बांगड्या, त्या तू वॉल हँगिंगसारख्या का लावल्यास ? किणकिण ऐकून मी आहे असं वाटतं ? पण आता विसर थोडं मला, इथे येऊन झालंय आता वर्ष, देवाघरी सगळं चांगलं असतं म्हणतात, तुला...

दिल से दिल तक..

नमस्कार! आजची पोस्ट थोडी खास आहे, म्हणजे माझ्यासाठी तशा सगळ्याच पोस्ट्स खास असतात पण आजची जरा जास्त खास आहे. आज कोणताही लेख नाही किंवा कविता नाही आज थेट “दिल से” लिखाण असणार आहे.   तर २०१५ साली याच दिवशी म्हणजे ३ जून २०१५ला मी माझी पहिली पोस्ट शेअर केली होती, म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर आज शब्दरांजण पाच वर्षांचं झालंय. आपलं शब्दरांजण पाच वर्षांचं झालंय. मला खरंतर काय लिहावं हे कळत नाहीये, कारण २०१५ साली वाटलंच नव्हतं की मी एवढ्या पुढपर्यंत येऊ शकेन. आजवर बऱ्याचदा मी हे बोललेय की, ‘लिहिणं आणि लिहीत राहणं यात फरक असतो’ आणि मला आनंद आहे की मी लिहीत राहिलेय.   ही पोस्ट लिहिण्याआधी सहजच ब्लॉग चाळत होते, तेव्हा जाणवलं की, नाही म्हणता म्हणता मी आजवर जवळपास ७७ पोस्ट्स लिहिल्या आहेत. या पूर्ण प्रवासात नवनवीन वाचक सोबत येत गेले आणि शब्दरांजण बहरत गेलं. आधी एक-दोन असणारे फॉलोअर्स आज २३च्या घरात आहेत. तुम्हाला वाचून वाटेल की, ‘त्यात काय मोठं? तेवीसच तर आहेत’ पण माझ्यासाठी वाचकांची संख्या खूप महत्त्वाची आहे आणि हे असे असे वाचक आहेत ज्यांनी शब्दरांजणला सबस्क्राईब केलेलं आह...

शब्दरूपी उरावे!

Image
आज सकाळी रत्नाकर मतकरींच्या निधनाची बातमी पाहिल्यावर मी सुन्न झाले, दोनेक सेकंदानी आईला दाखवलं, तिलाही धक्का बसला. काही वेळ मी तशीच बसून होते, तिला म्हटलं, “खूप वाईट वाटतंय गं आई मला” ती म्हणाली, “हो जुई पण आयुष्य आहे, आलेला माणूस जाणारच!” ‘आलेला माणूस जाणारच’ हलकीशी पुटपुटले, मनाला मात्र या सगळ्या practical गोष्टी पटत नसतात. कशीबशी आंघोळ आटपली, परत रडू आलंच. लगेच येऊन लिहायला बसले. खूप दुःख झालं की कधीतरी काय लिहावं हे कळत नाही मात्र आज माझ्याकडे लिहिण्यासारखं इतकं होतं की, रडता रडताही माझं डोकं सगळ्या आठवणी गोळा करून काय लिहायचं याच्या नोंदी बनवत होतं. खरंतर रत्नाकर मतकरी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं, त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, पटकथा, गूढकथा, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा बऱ्याच साहित्य प्रकारांमध्ये लेखन केलं. ते साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रकारही होते. त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले होते, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’ हे आईचं आणि माझं आव्द्त्म गाणं असलेल्या ‘माझं घर माझा संसार’ चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्का...

इरफान...

“प्रिय इरफान,            आज ना सांगता येणार नाही असं काहीतरी वाटतंय. वैयक्तिकरीत्या आपल्या ओळखीच्या नसलेल्या, आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या, आपल्या मित्रमंडळाचा भाग नसलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू होतो. पण तरीही आपल्याच घरातला माणूस देवाघरी गेलाय इतकं दुःख, इतका रितेपणा का येतो? करोडो चाहत्यांना आज इतका शोक करावासा का वाटतोय? “इरफान खान” एक सिनेअभिनेता, ज्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची दुःख, खंत, त्यांचे कष्ट हे सगळं आपण प्रत्यक्षात पाहिलेलं, अनुभवलेलं नाही. तरीही ही व्यक्ती अशी निघून जाणं अक्षरशः जिव्हारी लागलंय. लिहिणारी असले तरी मला प्रत्येक वेळी लिहावंसं वाटतंच, सुचतच असं नाही पण आज एवढं विचित्र काहीतरी वाटतंय की, रडता रडता समोर असलेला लॅपटॉप उघडून मी सरळ लिहायला घेतलंय. जीवन आणि मृत्यू, तसं बघायला गेलं तर जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं असतंच. मात्र काही माणसं गेली की वाटतं याने एवढ्यात जायला नको होतं, अजून सुंदर जगायला हवं होतं. सिनेसृष्टी ही झगमगाट, दिखावा आणि खोट्या बातम्यांसाठी प्रसिद्ध पण याच सिनेसृष्...

खेळ

वाचता वाचता अचानकच  पुस्तक बंद   मनात विचारांचं थैमान  आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर,   एकमेकांत गुंतल्या व्यक्तिरेखा  संवादाचं प्रचंड जंजाळ  घटना-प्रसंग एकमेकांना  करू लागले प्रश्नोत्तरं मनात सत्य-असत्याचा कल्लोळ  हृदयाची वाढलेली धडधड  संभ्रम, गोंधळ आणि उत्तराच्या अपेक्षेत  आ वासून उभे असलेले प्रश्न  डोकं बधीर आणि  पुस्तक पुन्हा उघडलं. हे खरं ? ते खोटं ? नेमकी कशी करावी मी पडताळणी ?   काही मापदंड ?  कोणतंही तत्व ?  की सगळेच माझ्या मनाचे खेळ ?